मुंबई : महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळ कमी झाला आहे. मंगळवार, १ आॅगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संकेतस्थळावर विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली.महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे, ५ हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. यंदापासून देशपातळीवर प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने, अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून अर्ज भरले होते. खोटी डोमिसाइल सर्टिफिकेट देऊन, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना धोका असल्याचे लक्षात घेऊन, संचालनालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी दोन दिवस उशिरा जाहीर केली.वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली, तेव्हा त्यात फक्त शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांची नावे होती. एकाही खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव नव्हते.कारण खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शुल्कावरून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर,सोमवारी महाविद्यालयांच्या संस्थाचालकांची संचालकांबरोबर बैठक झाली.या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास संमती दर्शविली होती. त्यानंतर, मंगळवारी पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, पण प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने, गोंधळ होण्याची शक्यता असल्याने, विद्यार्थी काही प्रमाणात चिंतेत आहेत.
खासगी मेडिकल कॉलेजांची यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:46 AM