ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 29 - पाकिस्तानात हिंदूंच्या मताला किंमत नाही व त्यांना मतस्वातंत्र्य नाही. त्यामुळे तेथील हिंदूंना मार खाण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या देशात मुसलमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान होतो. राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधीकाळी हिंदुत्वावरून रान उठविणारे आता सामील झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानात रोज मरणार्या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे बरे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.
'हिंदुस्थानातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात व त्यांना आझम खानसारखे येथील पुढारी साथ देतात. हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याची बांग आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मारली जाते, पण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर निर्घृण हल्ले सुरू आहेत व हे हल्ले दिवसेंदिवस वाढतच जात आहेत', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
'हिंदूंनी एकतर ‘इस्लाम’ कबूल करावा, नाहीतर मरणाला सामोरे जावे, अशी भयंकर स्थिती तेथे निर्माण झाली असली तरी याबाबत पाकड्या राज्यकर्त्यांना जाब कोण विचारणार हा प्रश्नच आहे. हिंदुस्थानातील मुसलमानांचे जितके राजकीय, आर्थिक व धार्मिक लाड केले जातात त्याच्या एक टक्का लाडही पाकिस्तानातील मुसलमानांचे होत नसतील. येथे आमच्या हिंदुस्थानातही मुसलमानांना साथ व हिंदूंना लाथ हेच धोरण सेक्युलरवादाच्या नावाखाली राबवले जात असते. त्यामुळे पाकिस्तानात पिचल्या गेलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाने मोदी सरकारकडे आशेची आस लावून बसावे काय', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
'दादरीत गोमांसावरून तणाव होताच येथील आझम खानने सरळ आपल्याच देशाविरुद्ध ‘युनो’कडे तक्रार करून धर्मांधतेची माती खाल्ली. हिंदुस्थानात मुसलमान सुरक्षित नसल्याची बोंब ठोकण्याची हिंमत येथे आझम खानसारखे लोक दाखवतात व देशाच्या अब्रूचे युनोत ‘धिंडवडे’ काढणार्या आझम खानला कोणी जाब विचारत नाही. पण ही आझम खान मंडळी कश्मीरातील हिंदूंच्या अत्याचाराबाबत चकार शब्द उच्चारायला तयार नाहीत. पाकिस्तानात व बांगलादेशात ज्या पद्धतीने हिंदूंचे शिरकाण केले जात आहे त्याबाबत साधा निषेधाचा सूर काढायला तयार नाहीत. मुसलमानांचे राजकीय रक्षणकर्ते म्हणून या मंडळींना फक्त मतांची ठेकेदारीच हवी आहे', अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.