ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - भाजपा आणि शिवसेनेतील कुरबुरी अद्यापही कायम असून भाजपावार कुरघोडी करण्याची संधी कधीच न सोडणा-या शिवसेनेने महागलेल्या तूरडाळीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या विधानाचा वापर करत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. सरकारने सरकारी काम करावे, पण आमची बांधिलकी सामान्य जनतेशी आहे. सत्ताबदल घडविणार्या जनतेला निदान ‘डाळ-भात’, ‘डाळ-रोटी’ तरी मिळायलाच हवी, असेही लेखात म्हटले आहे.
तूरडाळीच्या वाढलेल्या दरामुले राज्यातील महिलावर्ग अतिशय त्रस्त झालेला असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता वहिनींची भर पडली आहे व सामान्य गृहिणींच्या भावनांचा स्फोट केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गातर्फे आम्ही त्यांना लाख लाख धन्यवाद देत आहोत, असे सांगत सामनातून भाजपा सरकरावर निशाणा साधला आहे. तूरडाळीच्या प्रश्नास मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपाकघरातूनच तोंड फुटले हे महत्त्वाचे. डाळीच्या कमी भावाचं श्रेय घेण्यात आम्हाला रस नाही, पण सामान्यांच्या ताटात डाळ पडू दे, असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी केली आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- एकेकाळी गाजलेल्या ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या ‘डायलॉग’प्रमाणेच ‘तूरडाळीच्या भावाचे काय झाले?’ असा सामान्य प्रश्न सामान्य जनता विचारीत आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता वहिनींची भर पडली आहे व सामान्य गृहिणींच्या भावनांचा स्फोट केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गातर्फे आम्ही त्यांना लाख लाख धन्यवाद देत आहोत. ‘‘सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार्या तूरडाळीचे भाव आवाक्यात आलेच पाहिजेत,’’ असे सौ. अमृता वहिनीसाहेबांनी बजावले आहे. अमृता वहिनींनी सरकारला असा सल्ला दिला आहे की, ‘‘तूरडाळीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्यात ठेवायचे असतील तर सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी यांच्यातील ‘दलालां’ना म्हणजेच मध्यस्थ व्यवस्थेस दूर ठेवले पाहिजे!’’ सौ. अमृता वहिनी या एक सामान्य गृहिणी व खासकरून नोकरदार महिला असल्याने त्यांना सामान्य गृहिणींची ओढाताण समजली आहे. ऐन दिवाळीत तूरडाळ २०० रुपये किलोवर गेलीच कशी? हा प्रश्न आहे.
- तूरडाळीच्या ठिणग्या उडाल्यावर साठेबाजांवर छापेमारी सुरू झाली. प्रत्यक्ष त्या खात्याचे मंत्री गिरीश बापटही गोदामांवर धाडी घालून सरकारच्या कार्यक्षमतेची तुतारी वाजवीत होते, पण आजही तूरडाळीचे भाव खाली उतरले नाहीत. साठेबाजांकडून प्रचंड प्रमाणात जप्त केलेली तूरडाळ स्वस्त म्हणजे १२० रुपयांत बाजारात आणावी, ही शिवसेना मंत्र्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली; पण १२० कशाला? भाजपचे लोक ही डाळ १०० रुपये किलोने देऊन जनकल्याण करतील, अशी एक चांगली भूमिका घेतली. पण महाराष्ट्राची जनता आजही १०० रुपये किलोवाल्या तूरडाळीची वाट पाहात बसली आहे.
- आमच्या दृष्टीने हा विषय स्पर्धेचा किंवा चढाओढीचा अजिबात नाही. सामान्यांना किमान वरण-भात तरी सहजतेने मिळावा ही आमची भूमिका आहे. स्वस्त तूरडाळीचे १०० काय, १००० टक्के श्रेय आम्ही मुख्यमंत्री व त्यांच्या भाजप मंत्र्यांना द्यायला तयार आहोत. १०० रुपयेच काय, भाजप मंत्र्यांच्या प्रयत्नाने तूरडाळ सव्वा रुपये किलोने सामान्यांना मिळत असेल तर आम्ही त्यांचे दिलदारीने स्वागतच करू; पण एकदाची ती ‘डाळ’ सामान्यांच्या ताटात पडू द्या हीच आमची विनंती मायबाप सरकारला आहे.
- महागाईच्या काळात साठेबाजांची मान पकडून स्वस्त धान्यवाटप करण्याचा अनुभव आमच्या शिवसैनिकांपाशी आहे. स्वस्त धारा तेल, साखर, कांदे, भाज्या विकून शिवसैनिकांनी ही कार्ये तडीस नेली आहेत. त्यामुळे भडकलेली तूरडाळ शांत करायला कितीसा वेळ लागणार? पण १०० रुपये किलोची जबाबदारी घेणारे आमचेच मित्र असल्याने आम्ही हे श्रेय व संधी त्यांना देत आहोत. महाराष्ट्रात तूरडाळीचा कृत्रिम तुटवडा करीत भाववाढ करणार्या साठेबाजांवर नेमक्या काय कारवाया झाल्या?
- सत्ताबदल घडविणार्या जनतेला निदान ‘डाळ-भात’, ‘डाळ-रोटी’ तरी मिळायलाच हवी. राज्य साठेबाज व काळाबाजारवाल्यांचे नाही हे आता कृतीने दिसू द्या. ज्या व्यापार्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपास निधी दिला त्यांनीच साठेबाजी करून तूरडाळीचे भाव वाढवल्याचा आरोप शरद पवारांनी केला. यावर आम्ही काय बोलणार? आमचा बारामतीशी अजिबात संबंध नाही. ज्यांचा आहे त्यांनीच यावर बोलावे. तूरडाळीच्या प्रश्नास मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपाकघरातूनच तोंड फुटले हे महत्त्वाचे. सौ. अमृता वहिनींचे आभार!