मुंबई : घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘बल्ले बल्ले’ झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या संमेलनासाठी राज्य शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. याविषयी, मराठी भाषा विभागाकडून नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचा हा निधी दसऱ्यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा केला जाईल.अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अर्थसाह्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर प्रस्तावित संमेलनासाठी २५ लाख रुपयांच्या अर्थसाह्याची रक्कम वितरित करण्यात येईल, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.संमेलनासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीचे विनियोजन प्रमाणपत्र, संमेलन वृत्तांत, सनदी लेखापालांकडून तपासून घेण्यात आलेले लेख्यांचे विवरणपत्र संमेलनानंतर सहा महिन्यांच्या आत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने शासनाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास सादर करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)संमेलनाच्या आयोजनाबाबत नियम, कायदे आणि आर्थिक बाबी यांची यथायोग्य पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची असेल, राज्य शासन यासंदर्भात जबाबदार राहणार नाही, असे स्पष्टपणे परिपत्रकात नमूद केले आहे.
साहित्य संमेलनाच्या निधीला हिरवा कंदील!
By admin | Published: October 11, 2015 4:44 AM