राज चिंचणकरमुंबई : ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी साहित्य वर्तुळात नावाजली गेली आहे. या कादंबरीचे आता माध्यमांतर करण्यात आले आहे. याच नावाने ती मोठ्या पडद्यावर अवतीर्ण होण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, या साहित्यकृतीवर बेतलेल्या चित्रकृतीने यापूर्वीच तीन राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे. पुढील आठवड्यात ही चित्रकृती रसिकांच्या दरबारात रुजू होत आहे.स्मशानघाटावरील रूढी, तेथील प्रथा, समाजव्यवस्था यावर भाष्य करणारी ही कादंबरी चर्चेचा विषय झाली नसती, तर ते नवलच ठरले असते. ही कादंबरी खूप गाजली आणि तिला अमाप लोकप्रियताही मिळाली. अशा या दाहक विषयाला संजय कृष्णाजी पाटील यांनी हात घातला आहे. तिचे माध्यमांतर करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या लेखणीतून आतापर्यंत उतरलेल्या ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ यांसारख्या चित्रकृतींच्या मांदियाळीतील ‘दशक्रिया’ हे पुढचे पाऊल आहे. संदीप भालचंद्र पाटील या युवा दिग्दर्शकाने ही चित्रकृती दिग्दर्शित केली आहे.६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा (रूपांतरित) आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता अशा तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी ‘दशक्रिया’ या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, ५४व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये तब्बल ११ पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले आहे. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच बर्लिन येथील ‘इंडिया वीक’ फेस्टिव्हल, एनएफडीसी ‘फिल्म बाजार’ यांसारख्या महोत्सवांसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.
साहित्यकृतीचे माध्यमांतर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:53 AM