डोंबिवली : साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील शुक्रवारपासून डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात राजकीय मांदियाळी जमणार आहे. संमेलनाच्या उद््घाटन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर समारोप सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार असल्याने या संमेलनाचा एकूण नूरच पालटून गेला आहे. डोंबिवलीत प्रथमच साहित्य संमेलन होत असून, त्यासाठी पु. भा. भावे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. शं. ना. नवरे यांच्या नावाने सजलेल्या मुख्य सभामंडपात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांच्या हस्ते होईल. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी असहिष्णुतेचा मुद्दा मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने गतवेळी संमेलनाध्यक्षांचे भाषण चर्चेत आले होते. त्यामुळे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे स्वतंत्र विदर्भ किंवा मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय, पुण्यात राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध करावा, अशी मोहीम डोंबिवलीत सुरू झाल्याने संमेलनात त्याबाबतचा ठराव होणार का? याचीही उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)डोंबिवली शहर सजू लागलेसंमेलनाकरिता सांस्कृतिक नगरी डोंबिवली सजण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्थानके, संमेलनस्थळाकडे जाणारे रस्ते रांगोळ्या, पताका, कमानी यांनी सजवण्यात येत आहेत. राजकीय नेते, सांस्कृतिक संस्थांनी नियोजित व मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे व श्रीपाल सबनीस यांच्या तसेच शहरात येणाऱ्या साहित्यिक व रसिक यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. गुढीपाडव्याला शोभायात्रेनिमित्त असतो तसा उत्सवी व उत्साही माहोल तयार झाला आहे.सकाळी ग्रंथदिंडी उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता गणेश मंदिर ते पु. भा. भावे साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी निघणार असून, त्यातून या संमेलनाची वातावरण निर्मिती करणार. शहरांतील कलापथकांसह १५ हजार शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणाईचा सहभाग लक्ष वेधून घेणारा असेल.
साहित्य संमेलन आजपासून
By admin | Published: February 03, 2017 5:18 AM