मुंबई : वैशिष्ट्यपूर्ण कथा लेखनातून ग्रामीण विश्वाचे दर्शन घडविणारे ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी विक्रोळी येथील टागोरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्यिकांसह दलित, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकरी साहित्य चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आणि शंकर पाटील, माडगूळकर यांच्यानंतरचे प्रमुख कथाकथनकार म्हणून वामन होवाळ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथील टागोरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार एकनाथ गायकवाड, अविनाश महातेकर, सुबोध मोरे, अर्जुन डांगळे, प्रेमानंद गज्वी, दयानंद म्हस्के, ज.वि. पवार यांनी होवाळ यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ्या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे त्यांचे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. (प्रतिनिधी)
साहित्यिक वामन होवाळ अनंतात विलीन
By admin | Published: December 24, 2016 10:40 PM