मुंबई : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या मोफत प्रसारणासाठी दूरदर्शन सकारात्मक असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी टिष्ट्वटद्वारे दिली. विशेष म्हणजे या प्रसारणावरून गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. घुमान तसेच यापुढील प्रत्येक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन व समारोप सोहळयासाठी सह्याद्रीने शुल्क आकारू नये, अशी मागणी घुमान साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडून केली गेली होती. मराठीच्या प्रेमाखातीर का होईना, तावडे यांनी घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या प्रसारणासाठी दिल्ली येथील महासंचालक आणि मुंबईमधील संचालक यांच्याशी बोलणी केली आहे. शिवाय प्रसारण मंत्रालयाला पत्रही धाडले असून, आता याबाबत थेट प्रसारणाबाबतच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दूरदर्शन साहित्य संमेलनाच्या प्रसारणाबाबत सकारात्मक असून, याबाबतचा निर्णय सोमवारी होणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलनाचे प्रसारण होणार मोफत?
By admin | Published: March 16, 2015 3:26 AM