पुणे: बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय व्यासपीठावरून ‘राजा तू चुकत आहेस, सुधारलं पाहिजे’, अशी भूमिका मांडणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुख यांना शनिवारी भाजपा खासदार पुनम महाजन यांनी टोला लगावला. त्या शनिवारी सारसबागेत आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पुनम महाजन यांनी म्हटले की, साहित्यिक आणि कलाकारांनी उत्तम साहित्य, कला निर्माण करावी. उगाच 'राजा काय करतोय' या भानगडीत पडू नये. यावेळी लातूर येथील एका तरुण कवीने नवीन कलाकार, साहित्यिकांसाठी सरकारच्या काय योजना आहेत, असा प्रश्न महाजन यांना विचारला. वर, सर्वात आधी कलाकार साहित्यिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. तसेच 'राजा काय करतोय, प्रजा काय करते', हे विचारु नये असे सांगत संमेलनाध्यक्ष देशमुख आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधला.काही दिवसांपूर्वी बडोदा येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात 'राजा तू चुकतोयस, सुधारलं पाहिजे’ असे सांगत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला होता. त्यालाच महाजन यांनी प्रत्युत्तर देत कला आणि साहित्यात खूप काही करण्यासारखे आहे, असे सांगत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पुनम महाजन यांनी राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीसंदर्भातही भाष्य केले. इंजिनदेखील घडयाळ्याच्या ठोक्यावर चालते हे पुण्यातील मुलाखतीवरून दिसून आले, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
उगाच दुस-यांच्या पक्षात डोकावू नये विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. त्यातच शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद नसल्याचे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. यावर महाजन यांनी पवार यांनाच स्वत:च्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद आहे का ? आधी त्याकडे लक्ष द्यावे, उगाच दुस-याच्या पक्षात डोकावू नये, असा सल्लाही दिला.