ऑनलाइन लोकमत
वाशिम,दि. 20 -: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी अंतिम अर्ज करण्याला केवळ चार दिवस शिल्लक असून, एकूण प्रवेश क्षमतेच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात अत्यल्प अर्ज दाखल झाले. प्रवेश क्षमता ९०८ असून, आतापर्यंत केवळ २८८ प्रवेश अर्ज भरण्यात आले.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना आॅनलाईन नोंदणी करून इत्यंभूत माहिती सादर करावी लागते. वाशिम जिल्ह्यात ८२ शाळांनी नोंदणी केली. या शाळामध्ये ९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्जाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाली. आॅनलाईन प्रक्रियेमुळे पालकांना तांत्रिक गैरसायींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत अत्यल्प प्रवेश अर्ज भरण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम जिल्ह्यातील ८२ शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश क्षमतेच्या एकूण ९०८ जागा आहेत. या जागांसाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होणे अपेक्षीत आहे. आतापर्यंत केवळ २८८ अर्ज भरण्यात आले असून, पाच दिवसांवर अंतिम मुदत आहे. अंतिम मुदत असलेल्या २५ फेब्रुवारीपर्यंत किती अर्ज येतात, यावर प्रवेश प्रक्रियेची पद्धत अवलंबून राहणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर थेट प्रवेश दिला जाईल. क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले तरच लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.