- डिप्पी वांकाणी, मुंबईइंडोनेशियाच्या बाली बेटावर जेरबंद करण्यात आलेला गँगस्टर छोटा राजन हा भारतात केलेल्या गुन्ह्याबद्दल फारसा उपयोगी नसला, तरीही त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या दाऊद इब्राहीमच्या अंतर्गत कारभाराची माहिती मिळविण्यासाठी तो जास्त उपयुक्त ठरू शकतो. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी.एस. पसरिचा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.मुंबईत गुन्हेगारी जगत पूर्ण भरात असताना पसरिचा हेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यांच्या काळातच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी जगताच्या कारवायांचा बीमोड करण्यात आला होता. ‘लोकमत’शी बोलताना पसरिचा म्हणाले की, ‘कदाचित त्याच्या कथित ‘शरणागती’मागे गुप्तचरांनी महत्त्वाची भूमिका बजावली असावी. आता मात्र केवळ राजनवर ‘लक्ष्य’ केंद्रित करून विशेष सेल स्थापन केले पाहिजे. कदाचित, गुप्तचर संस्था आणि राजन यांच्यात तसा काही समझोता होण्याची शक्यता मी नाकारत नाही.’राजनची स्थानबद्धता आणि त्याने शरणागती पत्करली, असे आपल्याला वाटते काय? असे विचारले असता, ते म्हणाले की, ‘त्याच्या शरणागतीला मी नकार देत नाही. त्याच्या मूत्रपिंडाची स्थिती (किडनी) गंभीर असून, त्याला मधुमेहही आहे. तशातच आता गेल्या २-३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढले असून, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांचा त्रास सर्वांना समजून चुकला आहे. इंडोनेशिया हा स्वत:च दहशतवादाचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा प्रकरणी तो भारताला सहकार्य करीलच.’दाऊदचा मुकाबला करण्यासाठी गुप्तचर संस्था आतापर्यंत राजनचा वापर करीत होत्या काय, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दुसऱ्या गुन्हेगाराचा वापर करतात, हे सर्वत्रच आहे. मीसुद्धा गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगाराचा खबऱ्या म्हणून वापर केलेला होता. त्यामुळे येथेसुद्धा तसे नाकारता येत नाही. आता गुप्तचरांनाही थोडी-फार परतफेड करावीच लागेल.’राजनच्या जीविताला मुंबईत दाऊदच्या हस्तकांकडून धोका आहे. त्याच्यावर हल्ला होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘जे झाले ते झाले. आम्हीसुद्धा काही वर्षे कसाबला सुरक्षित जिवंत ठेवले होते. आमची यंत्रणा सुधारली आहे. आता आमच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सुविधा आहे.’विशेष सेल स्थापन करण्याची गरजराजनविरुद्ध १९९८ पूर्वी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर गुन्हेगारी कारवाया थंडावत गेल्या. तेव्हापासून आतापर्यंत अनेक साक्षीदार मरण पावले असावेत, जे आहेत ते पोलिसांशी सहकार्य करणार नाहीत. त्यामुळेच या प्रकरणाचा चांगला निष्कर्ष निघण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्याची गरज आहे.
छोटा राजनमुळे दाऊदची माहिती मिळणार
By admin | Published: November 01, 2015 2:01 AM