लोकमत न्यूज नेटवर्कवारजे : कुडजे गावाजवळ कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्या एका मादी हरणास ग्रामस्थ व प्राणिमित्रांच्या सहाय्याने कात्रज येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या धरणाच्या वारीलो भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने ते पाण्याच्या शोधात खाली आले असावे व कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार : सोमवारी कुडजे गावच्या पुढे आगळंबे फाट्यानजीक असलेल्या शेतात गणेश गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड यांना हरिण वन्यप्राणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लगेच वारजेचे प्राणिमित्र विनायक मुगडे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वारजेचे प्राणिमित्र आणि पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य विनायक मुगडे, प्रतीक महामुनी, विशाल वाटोरे, ऋषिकेश डोलारे व शिव देडे यांनी घटनास्थळी जाऊन ते जखमी हरिण ताब्यात घेतले व त्याच वेळी वनविभागाच्या सुनीता कुचगावे यादेखील तेथे पोहोचल्या. त्यांनी भेदरलेल्या हरणास पाणी पाजून प्राथमिक उपचार केले. सर्वांच्या मदतीने ते कात्रज प्राणी अनाथालयाकडे सुपूर्त केले. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कुत्र्यांनी हल्ला करू नये, म्हणून त्यास अधिक उपचारांसाठी कात्रजला पाठवले आहे. पूर्ण उपचारांती त्यास पुन्हा निसर्गात सोडण्यात येईल, असे वनरक्षक कुचगावे म्हणाल्या.
जखमी हरणास जीवदान
By admin | Published: June 07, 2017 1:29 AM