मुंबई - महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यावर कृपा केली असून, दोन दिवसांपासूनच्या संततधारेमुळे दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. जमिनीत ओल आल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे. खान्देश, निम्मा मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अतिवृष्टी झाली. मुंबईतही दिवसभर सरी कोसळल्या.नंदुरबारला नवापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. १०० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. पुरामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात एक पूल आणि पाच रस्ते वाहून गेले. जळगाव, धुळे जिल्ह्यांतही नद्यांना पूर आला आहे.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपासून संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विभागातील ४२१ पैकी १८९ मंडळांत अतिवृष्टी झाली. पाच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नांदेड व जालना जिल्ह्यांत पुरात दोन जण वाहून गेले.विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यवतमाळला पुरात दोघे, तर गडचिरोलीत एक हजार मेंढ्या वाहून गेल्या. वर्धा आणि वैनगंगा नदीला पूर आला आहे.नाशिकला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. गंगापूरसह १२ धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. पुण्यातही समाधानकारक पाऊस असून, बहुतांश धरणे भरत आली आहे.
मुंबईत रिमझिममुंबई : दिवसभर मुंबईवर ढगाळ वातावरण होते. प्रत्यक्षात मात्र किंचित ठिकाणी पडलेला तुरळक पाऊस वगळता पावसाने मुंबईकडे पाठच फिरवली होती. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरसह कांजूरमार्ग परिसरात तर पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव आणि बोरीवली परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. शहरात दिवसभर पावसाचे ढग होते. शनिवारसह रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.नंदुरबारला अतिवृष्टीनद्यांना पूर आल्याने धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात गुरुवारी रात्री १४० मि.मी. तर विसरवाडी मंडळात २३५ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला. रंगावली नदी, इतर नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. १७ म्हशी, पाच गायी, चार शेळ्या व एक घोडा अशी २७ जनावरे दगावली. रंगावली नदीकाठावरील ६५ घरे भुईसपाट झाली. विसरवाडी येथे १५ आणि चिंचपाडा येथे १० घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दळणवळण यंत्रणादेखील ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात पुरात वाहून गेलेल्या सईदा हसन काकर (५७), जमनाबाई लाशा गावीत (६५), वंतुबाई दोंदल्या गावीत (५५), काशीराम बाबजी गावीत (५०) यांचा मृत्यू झाला. एकाचे नाव समजलेले नाही.जळगावला हतनूर धरणातून विसर्गजळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने पन्नाशी ओलांडली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. तापी नदीला पूर आल्याने हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गारबर्डी धरण भरले आहे.मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत पाऊसमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.बीडला अतिवृष्टीबीड जिल्ह्यातील ६३ पैकी ९ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटला आहे.
धुळ्यात नद्यांना पूरधुळे जिल्ह्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. साक्रीतील कान व बुराई नद्यांना पूर आला. शिंदखेडा तालुक्यात नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे बैलगाडीवाहून गेली. दहिवेल बाजारपेठेत पाणी शिरले.औरंगाबाद, जालन्यात चांगला पाऊसऔरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांत चांगल्या पावसाची नोंद झाली झाली. पावसाअभावी काही जिल्ह्यांत पेरणी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. मका, कपाशी, तूर, मूग आदी पिके संकटात सापडली होती. दोन दिवसांपासून संततधार सुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले.जालन्यात एक जण पुरात वाहून गेलाजालना जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. भोकरदन तालुक्यातील मेराखेडा येथे वसंत क्षीरसागर (५०) हे गुराखी पुरात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.विदर्भातही पाऊसविदर्भातही पाऊस सुरू आहे. पश्चिम वºहाडात गत दोन दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुलडाण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. वाशिममधील मानोरा, मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांना जबर तडाखा बसला असून अनेक दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाºयांचे नुकसान झाले.परभणीत नद्यांना पूरपरभणी जिल्ह्यात सलग ३० तास झालेल्या संततधारेमुळे दुधना, पूर्णा, थुना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा १०० टक्के भरला आहे. च्लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पावसाने सरासरी ओलांडली आहे.नाशिकमधील गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठले आहे. गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेची पातळी वाढली असून गोसीखुर्द प्रकल्पाचे १६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १७०४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यवतमाळला पिकांसह घरांचे नुकसानपावसाने शेतपिकांसह घरांचे नुकसान झाले. उमरखेड व दिग्रस येथे नाल्याच्या पुरात वाहून दोघांचा मृत्यू झाला. आर्णी शहरात ६०० घरांमध्ये अरुणावती नदीचे पाणी घुसल्याने नुकसान झाले. दिग्रस शहरात धावंडा नदीच्या पुराने नुकसान झाले. शेकडो नागरिकांना शाळा, नगर परिषद कार्यालयांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली आली आहेत. जवळपास २०० जनावरे पुरात वाहून गेल्याची शक्यता आहे.वर्धा नदीला पूरचंद्रपूर वीज केंद्र व चंद्रपूरची तहान भागविणाºया इरई धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. पुरामुळे ११ गावांचा संपर्क तुटला होता. इरई धरणाचा साठा ५५ टक्के झाला आहे.गडचिरोलीत पावसाचा कहरगडचिरोलीत पावसाचा कहर सुरूच आहे. भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावरून शुक्रवारीही पाणी वाहत होते. शेतात पाणी साचल्याने धानाची कोवळी रोपे खरडून निघाली आहेत. विद्यार्थ्यांना ४ दिवसांपासून शाळेत जाणे शक्य झालेले नाही.पुणे जिल्ह्यात खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरल्याने तीनही धरणांतून शुक्रवारीही दिवसभर पाणी सोडण्यात आले.कोकणात अतिवृष्टीचा इशारामध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.