मुंबई : ज्यांच्या मनगटांत महाराष्ट्र आणि मुठीत विश्व अशा महारत्नांचा गौरव म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला गेला. त्यातील एक आघाडीचं नाव म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर रोहित शेट्टी.. गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, दिलवाले, सिंघम, सिम्बा असे एकाहून एक हिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात' Entertainment Trendsetter म्हणून गौरविण्यात आले.
वयाच्या १७ व्या वर्षी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून रोहितने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. कुकू कोहली यांच्यासोबत त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून फुल और काँटे, सुहाग व जुलमी या चित्रपटांत काम पाहिले. सुहागमध्ये त्याने अक्षय कुमारचा डमी म्हणूनही काम केले. त्यानंतर त्याने अनीस बाझमी यांच्यासह प्यार तो होना ही था, राजू चाचा आणि हिंदुस्थान की कसम या चित्रपटांत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. जमीन हा रोहितनं दिग्दर्शीत केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाला यश मिळवण्यात अपयश आले, परंतु त्यानंतर रोहितनं हिट चित्रपटांची रांगच लावली. त्याच्या या कामाचा लोकमतने बुधवारी गौरव केला.
या पुरस्कार सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. फडणवीस यांची ‘लय भारी’ मुलाखत अभिनेते रितेश देशमुख घेणार असून हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या समारंभात ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे खास भाषण हा या समारंभाचा उत्सुकतेचा विषय असणार आहे.
समारंभास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित आहेत. त्यांना यावेळी ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, अभिनेते विकी कौशल, इस्त्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या मायबोली या मराठी मासिकाचे संपादक नोह मासिल आणि क्रिकेटर स्मृती मानधना उपस्थित असणार आहेत. यावेळी दीपिका पदुकोण, विकी कौशल आणि रोहित शेट्टी यांच्याशी गप्पांची मैफल रंगणार आहे.