मुंबई : शिवसेना-भाजप युती नुकतीच जाहीर झाली. दोन्ही पक्षांमध्ये काही काळापूर्वी विस्तवही जात नसल्याचे युतीच्या घोषणेनंतर चित्र पालटले आहे. लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना शेजारी बसायला खुर्ची देत युती दाखवून दिली.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला हा नेत्रदिपक वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगला असून या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष बापट आदी राजकीय हस्ती उपस्थित आहेत.
भाजपाच्या प्रत्येक सभेमध्ये शिवसेनेशी युती होणारच असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील नेहमी ठणकावून सांगत होते. मात्र, शिवसेनेचे नेते त्यांचे वक्तव्य खोडून काढत होते. शिवसेनेकडूनही भाजप नेतृत्वावर टीका होत होती. मात्र, जनतेच्या भल्यासाठी एकत्र येत असल्याचे सांगत शिवसेना आणि भाजपाने युती केल्याची घोषणा केली आणि चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरली.
आज लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये याचा प्रत्यय आला. चंद्रकांत पाटील पहिल्या रांगेत बसले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रवेश केला आणि चंद्रकांत पाटलांकडे पाहून स्मितहास्य केले. चंद्रकांत दादांच्या शेजारच्या टेबलच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे बसले आणि त्यांनी चंद्रकांत दादांना शेजारी बसण्यास सांगितले. चंद्रकांत दादांनीही वेळ न दवडता. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत आपली खुर्ची उद्धव ठाकरेंच्या बाजुला नेत युतीतील कटुता मिटल्याचे संकेत दिले.