मुंबई - महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज संपन्न झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखत हे खास वैशिष्ट्य ठरले. यावेळी महाराष्ट्रातील माणसांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असा प्रश्न रितेश देशमुखने विचारला. रितेशचा हा प्रश्न सफाईदारपणे टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू.'' या उत्तरामधून मुख्यमंत्र्यांनी पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, युती कशी झाली याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे विचारणा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ''मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला.'' यावेळी चार वर्षे भांडल्यानंतर निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. मला एवढेच विचारायचे आहे की 'तुम जो मुस्कूरा रहे हो.... क्या गम हे जिसको छिपा रहे रहे हो.'' अशी विचारणा रितेशने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ''जो बित गया सो बित गया, अब नई शुरुवात हो, असा विचार आम्ही केला. तशी आम्हाला एकत्र राहायची सवयच आहेच. सध्या देशात असंगाशी संग करणाऱ्या, एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्यांच्या आघाड्या होत आहेत. पण आम्ही एकमेकांचे चेहरे पाहिले आहेत. चांगल्या आणि वाईट काळातही आम्ही एकमेकांसोबत होतो.आमच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद झाले होते. मात्र आता ते मतभेद विसरून आम्ही व्यापक महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत.'' असेही मुख्यमंत्र्यांवी संगितले.''
LMOTY 2019 : महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान कधी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले असे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:13 PM