Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. प्रशासन आय पी एस (प्रोमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या प्रोमिसिंग आय पी एस अधिकारी म्हणून मनोज पाटील (Manoj Patil) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
माझ्या कार्यकाळात गुन्हे वाढले, असे सांगणारे पोलीस अधीक्षक आहेत मनोज पाटील. तक्रारदार आला की, त्याची तक्रार दाखलच करून घेतली जाईल, याची हमी नसते. ठाणे अंमलदार केवळ तक्रार अर्ज घेतात, अदखलपात्र गुन्हा नोंदवून बोळवण करतात. मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात या प्रथा बंद केल्या. तक्रार अर्ज घ्यायचा नाही. थेट गुन्हा नोंदवायचा. अदखलपात्र गुन्हा नोंदवून एखादा गुन्हा बेदखलही करायचा नाही. गुन्हे दाखल होतील तेव्हाच गुन्हेगारांना चाप बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण १५ टक्के वाढले.
२०२० पर्यंत उशिराने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दरमहा २४८ होते. ते नंतर ३७ वर आले. अहमदनगर पोलिसांचे ई-टपाल सुरू केले. या प्रणालीत पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्येक टपालाचा ट्रॅक दिसतो. घरबसल्या नागरिक हे पाहू शकतात. या प्रणालीला २०२२ साली राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला.
काही आदिवासी जमातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला. या तरुणांना रोजगार देण्यासाठी २०२२ साली मेळावा घेत १,०२३ तरुणांना रोजगार दिला. दोन वर्षांत प्रलंबित प्रकरणांची संख्या ५३ हजाराहून ९ हजारांवर आणली. खून, दरोडा, चोरी अशा गुन्ह्यांतील ४ हजार ७४० आरोपी फरार होते. विशेष मोहीम राबवत १ हजार ६२७ आरोपींना अटक केली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत २ हजार १७४ प्रकरणे गहाळ होती. ही प्रकरणे रेकॉर्डवर आणून शोध घेतला. अपहरणाच्या प्रकरणांचा तपास लावण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवले.