अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत ही प्रश्नांसोबत जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारी होती. नाना आपल्या मनातलं बोलून दाखवतोय ही भावना ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होती. त्यातच नानांनी धमाल गोष्टी सांगितल्या. नाना म्हणाले, पूर्वी आपल्याकडे बार्टर सिस्टीम होती. बारा बलुतेदारांमध्ये धान्य दिले तर अमुक काम करून मिळायचे. आम्ही हे देऊ, त्या बदल्यात आम्हाला हे द्या, असा व्यवहार होता. मतदार म्हणून आम्हीसुद्धा तुम्हाला मत देऊ म्हणतो; पण लग्नपत्रिका छापल्यानंतर कुणीतरी दुसरीच मुलगी उभी आहे असं दिसतं. मग आम्ही केलेला आहेर वाया जातो. आम्ही आहेर द्यायचा कोणाला? आम्ही आहेर दिला कोणाला आणि तो गेला कोणाच्या घरात..? मग आम्हाला त्याचं वाईट वाटतं.
एकनाथराव... गंमत अशी झालेली आहे. राष्ट्रवादी वेगळा पक्ष, कॉंग्रेस पक्ष वेगळा, मनसे वेगळा. समाजवादी वेगळा. भाजप वेगळा. सर्व वेगवेगळे पक्ष. शिवसेना वेगळी. त्यावेळी आम्हाला असं काही वाटलं नाही. शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंपण विभागली गेलेली आहेत. माझे वडील, भावंडं किंवा माझी मुलं यांच्यामध्ये पण दोन गट पडले आहेत. ही फूट तुमच्यापुरती राहिली नाही, ती इतकी अशी वाढत गेली आहेत, त्याच आता आम्ही काय करायचं आम्ही. तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील. आमच्यातील भांडणाचं आम्ही काय करायचं? गावागावात छोट्या घरांत ही भांडणं सुरू झाली आहेत. तुमच्याही लक्षात येत असेल ते आणि ती जी भांडणं आहेत, ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठल्याही पद्धतीनं एकत्र याल आणि त्याला राजकारण हे नाव द्याल... आम्ही काय करायचं...? (या प्रश्नावर मात्र कोणीही उत्तर दिले नाही)
नानाचे बाेचरे प्रश्न इथं आम्हाला रस्त्यावरून जाताना काही चूक घडली की तुम्ही शिक्षा करता. तुम्ही काही चूक केले तर आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं? तुम्ही ज्यावेळी चुकीचं बोलता, तेव्हा आम्हाला नाही का वाईट वाटत? आम्हाला नाही का त्रास होत? मी कुणाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे? सत्ता म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात. तुम्ही राजे नाही आहात. आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. हा कारभार तुम्ही आमच्यासाठी चालवा... एकनाथराव... बोला काही तरी...
एकनाथ शिंदे : ‘तुम्ही जे म्हणालात ना, जे अडीच वर्षांपूर्वीच्या काळातलं तुम्हाला जाणवलं असेल. आम्हाला येऊन तीन महिने झाले. आम्ही राज्यकर्ते नाही, शासनप्रमुख नाही. आम्ही या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत.’ (टाळ्या)