लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘तुम्ही त्यांच्या घरी जाल, तर तुमचे आदरातिथ्य ताजच्या श्रीमंती क्रोकरीतून वाफाळती कॉफी देऊन होईल, पण त्या घराच्या आणि ‘टाटां’च्या बॉससाठी त्यांची कॉफी मात्र पारंपरिक स्टीलच्या कपातूनच येईल’ - टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांच्या साधेपणाविषयीचा अनुभव लोकमतचे संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांनी सांगितला आणि अवघे सभागृह या दिग्गज व्यक्तीच्या सुसंस्कृत साधेपणाने भारावून गेले. एन. चंद्रा यांच्याशी झालेल्या गप्पांमधून मग त्यांचा हा साधेपणा सतत डोकावत राहिला.
एन. चंद्रा यांचे अवघे कुटुंब हा भारतीय उद्योगविश्वातला एक विलक्षण आदराचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्याच्या एका छोट्या गावातले हे तीन बंधू. एन. चंद्रसेकरन हे टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष. त्यांचे बंधू एन. गणपती सुब्रमणियम टीसीएसचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि तिसरे बंधू एन. श्रीनिवासन हे मुरुगप्पा या बड्या उद्योगसमूहाचे वित्त संचालक. जमशेटजी टाटा, रतन टाटा यांनी जी जबाबदारी निभावली; त्याच खुर्चीवर बसताना हे ‘टेक ओव्हर’ होत असताना तुमच्या भावना काय होत्या?- असे ॠषी दर्डा यांनी विचारले तेव्हा ते नम्रपणे म्हणाले, अशा उत्तुंग व्यक्तींचे काम तुम्हाला करायला मिळते म्हणजे तुम्ही त्यांच्या खुर्चीवर बसता असे नसते... (यू आर नॉट फिलिंग देअर शूज)... मी कधीच याकडे ‘टेक ओव्हर’ असे पाहिले नाही. मला एक काम दिलेले आहे आणि ते उत्तम प्रकारे करायचे आहे, एवढाच विचार मी केला, करतो!’
टाटा उद्योगसमूहासाठी सर्वात महत्त्वाची आहेत ती या समूहाने निष्ठेने जपलेली मूल्यं! अब्जाहून अधिक भारतीयांपैकी प्रत्येकाची या समूहावर श्रध्दा आहे. टाटांना सर्वत्र यश मिळावे असे प्रत्येकालाच वाटते, या सदिच्छांचा आदर राखला जाईल, असे आमचे वर्तन असावे; हेच आमच्यापुढले सर्वात मोठे आव्हान आहे, असेही चंद्रा यांनी विनम्रतेने नमूद केले!
‘वैसे कौनसी चक्की का आटा खाते थे आप?’ भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चस्थानी पोचलेल्या या तिघा बंधूंबद्दल असणारी उत्सुकता लक्षात घेऊन ॠषी दर्डा यांनी विचारले, ‘वैसे कौनसी चक्की का आटा खाते थे आप?’सगळे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. एन. चंद्रा यांनाही हसू आवरले नाही. लहानपणी असे कुठले विशिष्ठ संस्कार केले गेले ज्यामुळे तुम्हा तिघा बंधूंना इतके उत्तुंग यश मिळवता आले, असे विचारले असता एन. चंद्रा यांनी दिलेले उत्तर मध्यमवर्गीय भारताच्या मूळ गाभ्यालाच हात घालणारे होते. ते म्हणाले, ‘नथिंग एल्स! गणितात शंभरपैकी शंभर मार्क मिळालेच पाहिजेत, एवढे नक्की शिकवले होते आमच्या लहानपणी!’
चंद्रसेकरन यांच्या पत्नी ललिता या फार कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्यासोबत दिसतात. मात्र या पुरस्काराच्या निमित्ताने त्या आवर्जून आल्या. पुरस्कार स्वीकारताना त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले आणि दोघांनी एकत्रित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचा स्वीकार केला.