लोकमतने ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहरासोबत माझा संबंध खूप जुना आहे. माझी कर्मभूमी मध्य प्रदेश जरी असली तरी जन्मभूमी, कौटुंबिक संबंधांची भूमी महाराष्ट्राची आहे, होती आणि राहणार. दादासाहेब मला मंत्री आल्याचे म्हणाले. मी महाराष्ट्रात मंत्री नाही, खासदार नाही. तुमच्याकडे आपला माणूस म्हणून आलोय, अशा शब्दांत मराठीमध्ये बोलून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यावेळी उपस्थितांचे मन जिंकले.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.
महाराष्ट्र आज औद्योगिक, शिक्षण आदी क्षेत्रांत प्रमुखता आम्ही पाहतो. महाराष्ट्राची विशेषता ही भारतासाठी बलिदानाची भूमी आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. शिवाजी महाराजांच्या मनात संघर्षमयी जीवन घेऊन, स्वराज्याची मशाल हातात घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. तीच माझीही भूमी आहे, असे केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.
माझी कर्मभूमी मध्य प्रदेश जरी असली तरी महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. शिवाजी महाराजांचा विचार होता, एक भारत श्रेष्ठ भारत. अहत तंजावर, तहज पेशावर सर्व मुलुख आपला. सप्तसिंधु आणि सप्तगंगा मुक्त करा हर हर महादेव, तोच विचार, आत्मनिर्भर भारताचा विचार पंतप्रधानांच्या नेतृत्वात पूर्ण झाली आहे, असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीमधील योगदान हे १५ टक्के आहे, असे ते म्हणाले.
सामाजिक क्षेत्रातील, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रातील सितारे, असा कार्यक्रम करून सर्वांना प्रेरणा मिळणार. लोकमतचे दर्डा कुटुंब आणि माझ्या कुटुंबाचा तीन पिढ्यांचा संबंध आहे. विश्वासाचे नाते, महाराष्ट्राच्या जनमतात लोकमत स्थापित झाले. लोकमत परिवाराला शुभेच्छा देतो, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.