बुधवारी संपन्न झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडलं. दरम्यान, याच मुलाखतीत अमित ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश आणि राजकारणातील घराणेशाहीबाबतही राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
अमोल कोल्हे यांनी राजकारणातील घराणेशाही संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीला राजकारणात आणू शकता. लादू शकत नाही. एका पातळीपर्यंत त्याला पुढे आणू शकता. हे माझं मत मी सांगतो. उद्या तुम्ही अमित ठाकरेंबाबत बोलाल, तर मी अमितला आणू शकतो. एक बाप म्हणून माझं कर्तव्य आहे. मी त्याला आणला तरी मी लोकांवर त्याला लादू शकत नाही. लोकांनी स्वीकारायचं असतं, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत घेताना खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना सर्वसामान्य युवकांनी राजकारणात यावं का? आपण युवा नेता म्हणतो तेव्हा राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्तीच राजकारणात येते आणि नेता होते. असा एकतरी नेता तुमच्या पाहण्यात आहे का, ज्याच्या नातेवाईकांवर कार्यकर्त्यांपेक्षा अधिक केसेस आहेत, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्यावर एवढ्या केस आहेत. महाराष्ट्रात जेवढ्या कुणाच्या नसतील तेवढ्या केसेस माझ्या अंगावर आहेत. मी अस्वल म्हणून फिरू शकतो एवढे केस माझ्यावर आहेत, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.
यावेळी राज ठाकरे यांना त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर चालेला का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला. यावर त्यांनी मश्किलपणे उत्तर दिल्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला. “शर्मिला ठाकरे जर सक्रिय राजकारणात आल्या तर मला चालेल. मी घरचं काम करायला तयार आहे,” असं उत्तर राज ठाकरे यांनी यावेळी दिलं. यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला. त्या माझ्या पुढे गेल्या तरी चालेल. इकडे काही अभिमान चित्रपटाची कथा नाहीये. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडले,” असं ते म्हणाले.