राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. कृषी विभागात यंदा पाच जणांना नामांकनं मिळाली होती. दरम्यान, जनुक संवर्धनासाठी १४ वर्ष झटणाऱ्या तपस्विनी सविता नाना पावरा यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सविता नाना पावरा यांच्याविषयी...
याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समिती, धडगावच्या माध्यमातून या आदिवासी लेकीने विविध स्थानिक पिकांच्या १०८ पीकजातीचे संवर्धन, जहन आणि व्यवस्थापन केले आहे. वात तृणधान्य, भरड धान्य आणि भाजीपाला आदीचे सवर्धन केले आहे. त्यांनी गावातील चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि महू झाडाचे संवर्धन यासाठी काम सुरु केले होते. यातूनच त्यांना पीक प्रजाती सांभाळून ठेवल्या पाहिजेत, असा विचार आला. १४ वर्षात त्यानी १०८ पीक प्रजाती पारपरिक सेंद्रिय वाणांचे संकलन केले आहे. सातपुड्यातील महुआ (मधुका इडिका) आणि चारोळी (चुकनानिया लाझान) या गुणधर्माची झाडे शोधून त्यांनी ६२ हजार २०० रोपे तयार केली, पारंपरिक पीक वाण संवर्धनात ८५७ शेतकऱ्यांना जोडलं आहे. पोषण सुरक्षेसाठी १,२०० हून अधिक कुटुंबांकडे परसबाग स्थापन करून भाजीपाला उत्पादनाचे कार्य केले केले जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ च्या सुपर ज्युरिंमध्ये लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुंबई पोलीस विशेष आयुक्त देवेन भारती, पद्मश्री सोनू निगम, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. चे अध्यक्ष रमेश दमाणी, एमक्योर फार्मा लिमिमटेडच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, शास्त्रीय गायक आणि राष्ट्रीय पुस्कार विजेते महेश काळे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रो सायन्स रिलायन्स हॉस्पीटलचे पद्मश्री अमित मायदेव, आदर्श गाव कार्यक्रम हिवरे बाजारचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, बालकृष्ण इंडस्ट्रिज लि. चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांचा समावेश होता.