मुंबई- प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आयपीएस प्रॉमिसिंग या श्रेणीमध्ये पाच जणांना नामांकन मिळाले होते. यात यंदा म्हणजेच २०२४ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे आयपीएस अधिकारी सोमय मुंडे (Somay Munde, Superintendent of Police, Latur) हे मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्यांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.
सोमय मुंडे यांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यांच्या शौर्याची ओळख म्हणजे मर्दनटोला जंगल परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पथकातील एकही जीवितहानी होऊ न देता २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे सोमय मुंडे लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. भारतीय पोलीस सेवेत कार्यरत असताना छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांतील त्यांची कारकीर्द गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणारी ठरली आहे. पोलीस पदक तसेच २०२२ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. हयातीत शौर्यचक्राने सन्मानित होणारे ते देशातील दुसरे आयपीएस अधिकारी आहेत. गुन्हे नियंत्रणाबरोबर गुन्हा घडूच नये यासाठी समुपदेशन उपक्रम राबविला. लातूर जिल्ह्यात एमपीडीअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करणारे मुंडे पहिले अधिकारी आहेत.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुपर ज्युरी मंडळात डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.