मुंबई - राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. राजकारण प्रॉमिसिंग या श्रेणीमध्ये पाच जणांना नामांकन मिळाले होते. यात यंदा म्हणजेच २०२४ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे आमदार कुणाल पाटील ( MLA Kunal Patil, INC, Dhule) हे मानकरी ठरले आहेत.
कुणाल पाटील यांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत धुळे तालुक्यातील १०७ गावांमध्ये ४०० पेक्षा अधिक बंधाऱ्यांचे खोलीकरण, दुरुस्ती, दोन नद्यांचे पुनरुज्जीवन, पांझरा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करुन हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळवून दिला. खान्देश विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे खान्देश संस्कृतिची ओळख व्हावी व तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, गुजरात भूकंप, मुंबई पूरग्रस्तांना मदत, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत, ५ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन केले. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे संस्थेच्या माध्यमातून कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय केली.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुपर ज्युरी मंडळात डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.