LMOTY 2024: प्रफुल्ल पटेल निकाल लागलाय, नो टेंशन; एकनाथ शिंदेंची नार्वेकरांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 08:24 PM2024-02-15T20:24:57+5:302024-02-15T20:25:43+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024 Eknath Shinde Speech: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे.
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: राष्ट्रवादीतील आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील निकालानंतर आज लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकत्र आले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी पटेल यांना उद्देशून निकाल लागलाय, नो टेंशन, असे स्मितहास्य दिले. यावेळी शिंदे यांनी आपल्यालाही हा पुरस्कार मिळाला होता, अशी आठवण ताजी केली.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. यावर उपस्थितांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, हा पुरस्कार देणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणे, अशा पुरस्कारामुळे उर्जा मिळते. आणखी काही लोक समाजात चांगले काम करू लागतात. म्हणून अशाप्रकारचे कार्यक्रम आवश्यक आहेत. शाहु, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. विविध भागात प्रसिद्धी पासून दूर, पडद्यामागे काम करणाऱ्यांना शोधून त्यांना पुरस्कार देण्याचे काम लोकमतने केलेले आहे.
जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग येतात, कोरोना सारखा प्रसंग आला, जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा लोकमत पुढे असते. केवळ वाईट गोष्टींवर टीका न करता लोकमतने चांगले काम करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. गेट वे ऑफ इंडियावर एवढा मोठा कार्यक्रम होतोय ही खूप चांगली बाब आहे, असे शिंदे म्हणाले.
मला देखील एकदा लोकमतने हा पुरस्कार दिला होता. दिल्लीत कार्यक्रम होता. अर्थमंत्री सीतारमन यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. कोरोना काळात चांगले काम केल्यामुळे पुरस्कार दिला होता. मी छोटा कार्यकर्ता होतो. राज्यसरकारच्या माध्यमातून सर्वांगिन विकासाचे काम करतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर-मुंबई काम सुरु झाले. रेकॉर्ड टाईममध्ये समृद्धी महामार्गाचे काम पुर्ण केले. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. मोदींचेही महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. परदेशी गुंतवणुकीत देखील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करत आहे, असे शिंदे म्हणाले.