मुंबई - पक्ष फोडाफोडीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले असते, परंतु तुम्ही ते उत्तर ऐकलं नाही. आम्ही जे काही केले त्यामागे कारणे होती. आम्ही केलेला उठाव होता असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राजभवन येथे बहुचर्चित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यातील मुलाखतीत माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंनी भाष्य केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डीसीएम झाल्याची नाही मला खंत, पण अचानक शांत का झाले जयंत...मगाशी एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचारला, तुमचा एवढा मोठा पक्ष आहे तरीसुद्धा दुसरे पक्ष का फोडता...ते उत्तर द्यायला तयार होते पण तुम्ही उत्तर ऐकायला तयार नव्हता. आम्ही जो उठाव केला त्याला तसं कारण होते. जेव्हा पडले बाळासाहेबांच्या विचारांवर घाव, तेव्हा आम्हाला करावा लागला उठाव. तो उठाव होता, फोडाफोडी नव्हती असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी हुडी घातली तेव्हापासून बऱ्याच लोकांना हुडहुडी भरलीय. आमच्या लाडक्या ताईचा सन्मान झाला. लाडक्या बहिणींनी विधानसभेला कमाल केली. मागील १५ वर्षापासून लोकमत या पुरस्काराचं वितरण करतंय. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या दोघांना एकत्रित आणण्याचं काम लोकमतने केले. जयंतरावांना प्रश्न विचारायला लावले, विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू आहे ते आणखी सुरळीत होईल. महाराष्ट्रीयन या नावातच सगळं आहे. महाराष्ट्रात जो कुणी चांगले काम करेल त्याच्या पाठीवर थाप देण्याचं काम लोकमत करतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान, मी लोकमतचा वाचक आहे. जसा वेळ मिळेल तसा लोकमत चाळतो. माझा फोटो कुठे आहे, बातमी कुठे आहे ते पाहतो. तुम्ही नेहमी न्याय देता. चांगले काम करणाऱ्याला प्रसिद्धी देता, कधी कधी चिमटे काढता, कधी टीकाही होते. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आमची टीम होती, त्या सरकारच्या कामाला आपण १०० पैकी १०० मार्कही दिले आहेत. चांगल्याला चांगले म्हणण्याचं काम लोकमतने केले. लोकमतसारखं वृत्तपत्र हे आमच्यासारख्यांचे प्रगतीपुस्तक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खेडोपाडी लोकांच्या हाती लोकमत दिसतो. लोकांना खऱ्या अर्थाने वाचक बनवण्याचं काम लोकमत आणि दर्डा कुटुंबीयांनी केले असं कौतुकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.