महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्याने मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी "राज ठाकरे आमचे चांगले मित्र" असं म्हणत मनसेसोबतच्या युतीबद्दल 'राज की बात' सांगितली आहे.
राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या महायुतीत मनसे कुठे असेल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला वेळ सांगेल. आमची राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो. काही चांगल्या सूचना ते अनेकवेळा करतात. तर कधी आमच्यावर टीका देखील करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल. अजून असा काही निर्णय घेतलेला नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईत महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे.
"भाजपाने आपलं स्वत्व सोडलं तर मतदारांना आवडणार नाही. पण, आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीराम, भारत माता की जय म्हणत आहेत. त्यामुळे मतदारांना हे नक्कीच पटेल. ज्या लोकांनी तेव्हा आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, तेच लोक आज आमचं हिंदुत्व स्वीकारत असतील, तर आमच्या मतदाराला नक्कीच त्याचा आनंद होईल" असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.