नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्यांच्या बँकेत जमा होईल. मागच्या सरकारनेही कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. पण त्यात वारंवार सुधारणा केल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली नव्हती.'' दरम्यान राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून एक कठोर कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. ''राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुख्यमंत्री कार्यालय सुरू केले जाणार आहे. जेणेकरून त्या त्या जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या शासकीय कामासाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागू नयेत असे एक सीएमो कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे ही सगळी कार्यालय मंत्रालयाच्या कार्यालयाशी निगडीत असतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. विदर्भाच्या विकासासाठी भरीव काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ''पूर्व विदर्भातील खनिज साठा हा आजपर्यंत दुर्लक्षित राहिला. त्यासाठी पूर्व विदर्भात दिल भिलाई स्टील प्लँटच्या धर्तीवर पूर्व विदर्भात एक स्टील प्लँट उभारण्याचा मानस सरकारचा असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 8:11 PM