विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठीची आर्थिक तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे याच अधिवेशनात केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्र परिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत घोटाळा झाला होता. या घोटाळ्यावरुन कॅगने ताशेरे ओढले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पण आम्ही युती सरकारने दिलेल्या कर्जमाफीत अनियमितता होऊ नये यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यव होऊ नये अशी आमची भूमिका आहे. २५ हजार केंद्रांच्या माध्यमातून कर्जमाफीची व्यवस्था उद्यापासून सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला.राज्यात ९८ टक्केपेरण्या पूर्णराज्यात ९८.०३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीच्या मुद्यावरुन सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या समितीमध्ये असे काही नेते आहेत की जे हौशे-गौशे आहेत आणि त्यांना ते शेतकरी नेते असल्याचे वाटते. आपली दुकानदारी कायम राहावी म्हणून ते काहीतरी करीत असतात. त्यांना शेतकरीच जागा दाखवतील.मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कथित घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. पुराव्यांसह आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने शिल्लक असलेल्या २३ लाख क्विंटल तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना टोकन दिले आहे. या खरेदीची चौकशी सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्जमाफीची तरतूद अधिवेशनात - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:10 AM