लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरसकट कर्जमाफी देताना जमिनीची मर्यादा न ठेवल्यामुळे राज्यातील ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात दिली. कर्जमाफी आणि कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सविस्तरपणे उत्तरे दिली. ते म्हणाले, सुरुवातीला आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु इतर शेतकऱ्यांचा प्रश्न समोर आल्यानंतर आम्ही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. देशातील विविध राज्यांनी कर्जमाफी जाहीर करताना अटी घातल्या आहेत. पंजाब सरकारने ५ एकरापर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. तेलंगण सरकारने फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तर कर्नाटक सरकारने केवळ जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. तसेच आंध्र प्रदेश सरकारने दोन हेक्टरची मर्यादा घातली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.आम्ही सर्वांना सरसकट कर्जमाफी दिली, यासाठी कुठल्याही अटी ठेवल्या नाहीत. दीड लाखापर्यंतची कर्जे माफ करण्यात आली आहेत. जमिनीची मर्यादाही ठेवण्यात आली नाही. शिवाय, कर्जाचे पुनर्गठण केलेल्यांनाही याचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगत कर्जमाफीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून प्रत्येक बँक खात्याची आधार क्रमांकावरून पडताळणी करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्जमाफीचा लाभ ३६ लाख शेतकऱ्यांना
By admin | Published: July 10, 2017 5:44 AM