कर्जमाफीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:58 AM2019-12-20T10:58:02+5:302019-12-20T10:58:59+5:30
ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे.
नागपूरः ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठकही झाली होती. त्यानंतर ठाकरे सरकार लवकरच कर्जमाफी देणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे.
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं.
सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.