ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ३० : इस्लामपूरजवळच्या नायकलवडी (ता. वाळवा) येथील शेतकरी बबन पांडुरंग यादव (वय ८0) यांनी कर्जाला कंटाळून घराच्या पाठीमागील असणाऱ्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.बबन यादव यांचे घर नायकलवाडी-सुरुल रस्त्यालगतच्या शेतात आहे. शेती करत करत त्यांनी पेठ येथे कापड दुकान सुरु केले होते. हे दुकान त्यांनी १५ वर्षे चालवले.
परंतु शेतीतून दुकानासाठी वेळ देता येत नसल्याने त्यांनी पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली.शेतीसाठी यादव यांनी बँक, पतसंस्था व सोसायटीकडून अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे कर्ज काढले होते. या कर्जाची परतफेड न करता आल्याने व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढतच होती. त्यातच यादव यांना पोटाचा विकारही होता. या आजारपणावर त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता. बँक, पतसंस्थेचे कर्ज भागवता येणार नाही, या नैराश्येतून शुक्रवारी घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना गावात समजताच ग्रामस्थांनी घराजवळ गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली असा परिवार आहे.