मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्र-कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक पदाकडे लागले आहे. प्र-कुलगुरू पदावर आपल्या गटातील व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी प्राचार्यांच्या गटांमध्ये चढाओढ लागली असून या पदासाठी मधू नायर, डॉ. विजय जोशी आणि कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांच्यासह सिद्धेश्वर गडदे यांची नावे चर्चेत आहेत.मुंबई विद्यापीठाचे मावळते कुलगुरू राजन वेळुकर यांचा कार्यकाळ ६ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड केली आहे. देशमुख यांच्या नियुक्तीनंतर आता सर्वांचे लक्ष प्र-कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक पदाकडे लागले आहे. या पदांसाठी सध्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. प्र-कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेत कुलगुरूंचा महत्त्वाची भूमिका निभावत असतात. या पदासाठी कुलगुरू काही नावे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती यांच्याकडे पाठवतात. या नावांमधून एका व्यक्तीची निवड प्र - कुलगुरू पदासाठी केली जाते. या पदासाठी कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनीही प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच प्र-कुलगुरू पदाबरोबरच बीसीयूडी संचालक पदासाठी ही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, नवनियुक्त कुलगुरूंनी पदभार स्वीकारल्यानंतर या पदांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्र-कुलगुरू पदासाठी लॉबिंग सुरू
By admin | Published: July 02, 2015 1:05 AM