विजय बाविस्कर, पुणे ना नोटाबंदी, ना कोणाची लाट... स्थानिक नेतृवाचे काम व पकड हा एकच फॅक्टर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत निर्णायक ठरला. जिल्हा परिषदेच्या कारभारी बदलाची विरोधी पक्षांनी दिलेली हाक न ऐकता ग्रामीण मतदारांनी आपल्या गणात, गटात व तालुक्यात असलेल्या स्थानिक नेतृत्वावरच विश्वास दाखवला असल्याचे निवडणुक निकालांतून दिसून आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील राजकीय परिवर्तनाची लाट राज्यातही दिसून आली. २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समितींच्या निवडणुकीतही भल्याभल्यांचे अंदाज फोल ठरवले. अनेक ठिकाणी सत्तांतर झाले. गेल्या निवडणुकीत राज्यात एक नंबरवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसला तिथून पायउतार व्हावे लागले. सांगली जिल्हा परिषदेत तर कधी फोपळाही न फोडलेल्या भाजपाने सत्ता मिळवली. असे राज्यात चित्र असताना पुणे जिल्हा परिषदेत मात्र राष्ट्रवादीने गड राखल्याचे दिसून आले. जिल्ह्यात दखल घ्यावी असे परिवर्तन झाले नाही. राष्ट्रवादीची सदस्यसंख्या ४१ वरून वाढून ४४वर गेली. तर ३ सदस्यसंख्या असलेल्या भाजपाला फक्त ७ जागा मिळविण्यात यश मिळाले. राज्यात जर परिवर्तनाची लाट होती तर पुणे जिल्हा परिषदेत हे परिवर्तन का दिसले नाही? याचे विश्लेषण करायचे म्हटल्यास, प्रत्येक ठिकाणचे स्थानिक नेतृत्व व त्याची असलेली पकडच अंतिमत: प्रभावी ठरली. त्यामुळे ना कुठे नोटाबंदीचा फटका बसलेला दिसला, ना कुठे परिवर्तनाची लाट दिसून आली. स्थानिक नेतृत्वावर जिल्ह्यातील मतदारांनी दाखवलेला विश्वास बहुतांश ठिकाणी अधोरेखीत होता. बारामतीकरांनी तर यावेळी सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादीला देऊन येथे कोणतीच लाट येऊ शकत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. इंदापूर तालुक्यात आमदार राष्ट्रवादीचे आहेत, मात्र येथील मतदारांनीही हर्षवर्धन पाटील यांच्यावर विश्वास ठेवत पंचायत समिती त्यांना दिली व जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पाठवले आहे. दौंड तालुक्यातील निवडणुकही यावेळी ‘भीमापटस’ या एकाच स्थानिक मुख्य मुद्यावर झाली तेथे आमदार राहूल कूल यांना याची मोठी झळ बसली. नाही म्हणायला, काही ठिकाणी मतदारांनी दिग्गजांनाही धडा शिकवला. शिरुर तालुक्यात विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांचा मुलगा राहुल पाचर्णे याचा पराभव झाला तर दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पुरस्कृत उमेदवारांचा पार धुव्वा उडाला. ७५ पैैकी १३ जिल्हा परिषद गट हे एकट्या हवेलीतील आहेत. त्यामुळे हवेलीत यावेळी मोठे परिवर्तन होईल व त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल, अशी शक्यता निवडणुकीपूर्वी जाणकारांकडून व्यक्त होत होती. मात्र हवेली तालुक्यावर राष्ट्रवादीने पकड कायम ठेवली आहे. स्थानिक प्रश्नांना तडीस लावेल अशाच नेतृत्वाला पुढे आणण्याचे सुयोग्य भान सुजाण मतदारांनी दाखवून दिले आहे.
पुण्यात स्थानिक नेतृत्वच प्रभावी
By admin | Published: February 25, 2017 1:05 AM