ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबई रेल्वेतील गर्दी दिवसेदिवस वाढतच चालली असून सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण, डोंबिवली येथून ट्रेनमध्ये चढणे महाकठीण असते. तर घरी परततानाही चाकरमान्यांना मुलंड, ठाणे येथे उतरण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. प्रचंड गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही बरेच वाढले असून या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यावर उतारा म्हणून मध्य रेल्वेतर्फे ' अतिजलद' गाड्या चालवण्याचा विचार होत असल्याचे वृत्त आहे.
पीक अवर्समध्ये कल्याण, डोंबिवली व ठाणे येथून अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतराने सात ते आठ अतिजलद गाड्या सोडण्याचा विचार असून त्यादृष्टीने लवकरच चाचणी करण्यात येणार आहे. मात्र यामुळे ठाण्याच्या पुढे राहणा-यांना फटका बसेल हे लक्षात घेता, आधीच्या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने त्या वेळेत आणखी दोन-तीन गाडय़ा वाढवून मधल्या स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा देण्यात येईल.
नवीन प्रस्तावानुसार कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या या थेट सीएसटी स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत. ही सेवा कितपत यशस्वी ठरु शकते याची आधी चाचपणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते सीएसटी प्रवास जलद होईल. सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये या लोकल सोडल्यास गर्दीच्या समस्येतून थोड्याफार प्रमाणात उतारा मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे. तसेच या गाड्यांना दादरला थांबा देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे समजते.