- सुशांत मोरे, मुंबई
मुंबई उपनगरीय लोकल सेवेला होणाऱ्या मोठ्या तोटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रकल्पांसाठी उभ्या कराव्या लागणाऱ्या निधीसाठी, एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) सर्व मार्गांवरून (मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वे) लोकल प्रवासासाठी पास योजना तयार केली आहे. सेकंड क्लास प्रवाशांसाठी ५०० रुपयांत, तर फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी १,५०० रुपये पासाचे शुल्क आकारण्यात येईल. तसा प्रस्तावच तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच रेल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी देशभरातील रेल्वेच्या प्रत्येक विभागाकडून विविध सूचना मांडण्यात आल्या होत्या. या शिबिरात एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते आणि त्यांच्याकडून मुंबई उपनगरीय रेल्वेचा विस्तार, चालवण्यात येणाऱ्या फेऱ्या आणि मिळणारे उत्पन्न इत्यादी माहिती सादर करण्यात आली. या माहितीला जोडूनच त्यासाठी उपनगरीय लोकलच्या तिकीटदरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील अनेक योजना सादर करण्यात आल्या. या योजनेनुसार मुंबई उपनगरीय लोकलचे चार विभाग करतानाच, एका विभागातून दुसऱ्या विभागात प्रवास करताना, त्यानुसार तिकीटदर बदलाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव सादर करतानाच, यात महिनाभर लोकल प्रवासाचा पर्यायही देण्यात आला. त्यानुसार, सेकंड क्लास प्रवासी महिना ५०० रुपयांचा सर्वसमावेशक पास काढून मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेतून फिरू शकतो. फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी तो १,५०० रुपयांपर्यंत मिळेल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात यांनी सांगितले. या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्याचे पास दर हे फारच जास्त असून, या नवीन दरामुळे प्रवाशांनाच फायदा होईल आणि रेल्वेचे उत्पन्नही बरेच वाढेल. महत्त्वाची बाब म्हणजे, सेकंड क्लासमधून प्रवास करणारा प्रवाशालाही फर्स्ट क्लासचा प्रवास परवडू शकेल. उत्पन्न वाढीसाठी एमआरव्हीसीची शक्कलपासधारकांपेक्षा दररोजच्या तिकिटांतूनच रेल्वेला उत्पन्न मिळते. त्यातही सेकंड क्लासचे पासधारक फर्स्ट क्लासकडे वळल्यास उत्पन्नही चांगलेच वाढेल. त्यामुळे पासधारकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात असून, उत्पन्न वाढीसाठी एमआव्हीसीने सर्व मार्गांवरून ५०० रुपयांत महिनाभर लोकल प्रवासाची शक्कल लढवली आहे.