मुंबई : रेल्वे मोठ्या आर्थिक संकटात असून, यासाठी लोकल आणि इंटरसिटीसारख्या सेवांच्या प्रवासभाड्यात वाढ करण्याची शिफारस डी.के. मित्तल समितीने रेल्वे मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात केली आहे. रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी डी.के. मित्तल समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा सध्या तोट्यात असून, प्रवाशांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तिकीट दरवाढ मुंबईकरांनी स्वीकारायला हवी, असे रेल्वे बोर्डाचे सदस्य देवीप्रसाद पांडे यांनी नुकतेच मुंबई दौऱ्यात सांगितले होते. त्यामुळे उपनगरीय लोकल प्रवास महागणार याचे संकेतच त्यांनी यातून दिले होते. तर दुसरीकडे रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रेल्वेने एक विशेष डी.के. मित्तल समिती नेमली आहे. याच समितीने रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी भाडेवाढीच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, २०१४मध्ये लोकलच्या भाड्यात दुप्पट वाढ केली होती. मात्र त्याला विरोध झाल्याने ही भाडेवाढ मागे घेत फक्त १४.२ टक्केच भाडेवाढ मासिक पासांच्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या दरात केली होती. (प्रतिनिधी)
लोकल प्रवासदर दुपटीने महागणार?
By admin | Published: January 19, 2015 5:42 AM