मुंबई : बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे नुकताच पाठविण्यात आला. या प्रकल्पातून धावणारी लोकल ही ताशी ६0 किलोमीटर वेगाने धावेल आणि ४८ मिनिटांत सीएसटी-पनवेल प्रवास पूर्ण करेल, असे प्रकल्पाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टिळकनगर स्थानकाचा या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे. सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पात ११ स्थानकांचा समावेश आहे. यात आठ एलिव्हेटेड (उन्नत) तर तीन समांतर स्थानके आहेत. सीएसटी, वडाळा, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, नेरुळ, बेलापूर ही स्थानके एलिव्हेटेड तर वाशी, खारघर, पनवेल स्थानके अन्य स्थानकांना समांतर अशी करण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्वी कॉटन ग्रीन स्थानकाचा समावेश करण्यात आला होता; मात्र या प्रकल्पाचा पुन्हा नव्याने प्राथमिक अहवाल तयार करताना कॉटन ग्रीन स्थानकाऐवजी टिळक नगर स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. टिळक नगर स्थानक हे एलिव्हेटेड असेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तर कॉटन ग्रीन स्थानक एलिव्हेटेड उभारण्यात तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे नवी मुंबई एअरपोर्टमार्गे एलिव्हेटेड प्रकल्प जाणार असल्याने हेदेखील नवे स्थानक म्हणूनही उदयास येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास सध्या सीएसटी ते पनवेल असा ७५ मिनिटांचा होणारा प्रवास ४८ मिनिटांत होईल. ताशी ६0 किलोमीटर वेगाने या मार्गावरून लोकल धावणार असल्याचे सांगण्यात आले. एलिव्हेटेड मार्गावरून सहा डब्यांची किंवा आठ डब्यांची लोकल चालविण्याचा विचार एमआरव्हीसीकडून करण्यात आला आहे. २0२२पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याने त्यासाठी एमआरव्हीसीकडून सर्व बाबी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)
ताशी ६0 किलोमीटर वेगाने धावणार लोकल
By admin | Published: August 09, 2016 4:16 AM