मुंबई : प्रवाशांनी खच्चून भरलेली जलद लोकल शेवटच्या स्थानकात न थांबताच थेट यार्डात गेली तर... असाच काहीसा प्रकार पश्चिम रेल्वेवर आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडला. त्यामुळे प्रवाशांना यार्ड ते स्थानक अशी पायपीट करावी लागली. या घटनेनंतर संबंधित लोकलचा मोटरमन, गार्डवर कारवाई केली जाणार आहे. चर्चगेटहून मालाडसाठी सकाळी ११.०६ वाजताची जलद लोकल सुटते. ती मुंबई सेन्ट्रलनंतर जलद धावते. अंधेरी स्थानकानंतर लोकल मालाड स्थानकात ११.५०च्या सुमारास येते. परंतु अंधेरी स्थानक सोडल्यानंतर लोकल थेट कांदिवली स्थानकातील यार्डमध्ये जाऊन थांबली. यार्डात गेल्यानंतर प्रवाशांना भर उन्हात मालाड स्थानकापर्यंत ट्रॅकवरुन पायपीट करावी लागली. काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे जाऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार मोटरमन आणि गार्डवर कारवाई केली जाणार आहे. मोटरमन मालाड स्थानकात लोकल थांबवण्यास विसरल्याचे कारण सांगितले जात आहे. तर मोटरमनला ‘डुलकी’लागल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. याआधीही पश्चिम रेल्वे मार्गावर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सोबतच प्लॅटफॉर्म सोडून लोकल पुढे जाऊन थांबल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (प्रतिनिधी)
स्थानकात न थांबताच लोकल थेट यार्डात
By admin | Published: April 25, 2017 2:43 AM