- विशाल शिर्केपिंपरी-चिंचवड : टाळेबंदी (लॉकडाऊन) काळामध्ये राज्यातील ३३ लाख ५३ हजार कृषी ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. त्यांच्याकडे तब्बल ३५ हजार ७२६ कोटी रुपये थकीत आहेत. इतक्या रकमेची वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणसमोर आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. जून महिन्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली. मात्र, या काळात महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कृषीसह घरगुती, औद्योगिक, वाणिज्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा अशा ९८ लाख ५ हजार ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. ही रक्कम तब्बल ४७ हजार ४ कोटी इतकी आहे. त्यातील ३५ हजार ७२६ कोटी रुपये ३३ लाख ५३ हजार ४३४ ग्राहकांकडे आहेत, तर उर्वरित ११ हजार २७७ कोटी रुपये कृषी वगळून इतर ग्राहकांकडे आहेत.कृषी विभागातील सर्वाधिक १० लाख थकबाकीदार पुणे प्रादेशिक विभागातील आहेत. मात्र, सर्वाधिक थकबाकी औरंगाबाद आणि कोकण विभागात आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच पुणे प्रादेशिक विभागातील वीज वितरण हानी कमी करण्यासाठी कृषी पंपांसह संबंधित रोहित्रांचे सर्वेक्षण करून अनधिकृत वीज जोडण्या काढण्याचे आदेश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. तसेच वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे.वीज ग्राहकांना आवाहन ग्राहकांनी वीजबिल भरावे यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे. महावितरणने लॉकडाऊन काळात दरम्यान अखंडित वीजपुरवठ्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन ग्राहकांनी बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
लॉकडाऊनमध्ये 33 लाख कृषी ग्राहकांनी बिल भरले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 3:11 AM