मुंबई : सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.
पुन्हा कडक निर्बंध- लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार- उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार- कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार
- जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
- कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करून एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधावेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी.
- ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.
मास्क न घालणाऱ्यांना दंड करायलाच हवा जे लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री