मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन सरसकट हटवला जाणार नाही, पण निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. (lockdown extend in-maharashtra in some places, rules will be relaxed says rajesh tope)
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत संपत आली असून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचे मत लॉकडाऊन लगेच काढणे शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.
("मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका)
याचबरोबर, राज्यात सरसकट लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे राजेश टोपे म्हणाले. तसेच, सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला आहे. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौक्ते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
'लसींबात धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार' ग्लोबल टेंडरमध्ये मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी किंमत दिली आहे. तर काही कंपन्यांनी किमतीबाबत माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. इतर लसींनाही परवानगी देण्याबाबतचा विषय केंद्राचा आहे. त्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
("भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?")
दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन आता १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.