योगेश बिडवई
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे जगभरातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असताना एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून विक्रमी ३७५ कोटींची कांदा निर्यात झाली आहे. एवढेच नव्हे कोकणचा राजा हापूस आंब्याची चार हजार मेट्रिक टन निर्यात झाली. राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाने स्थापन केलेल्या शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे एप्रिलमध्ये तब्बल २ लाख ३० हजार ५६५ मेट्रिक टन शेतमालाची निर्यात झाली आहे.
बहुतांश देशात विमान सेवा बंद असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात केवळ १५ हजार मेट्रिक टन कमी आहे. कांद्याची १ लाख ७० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली. यंदा आंबा हंगाम उशीरा सुरू झाला. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने उत्पादक अडचणीत आले. मात्र आंबा निर्यातीमुळे बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला. निर्यातीमुळे स्थानिक बाजारपेठेत भाव मिळण्यासही मदत झाली आहे.सर्व जगालाच पुढचा काही काळ कोविड-१९ सोबत जगावे लागणार आहे. मात्र या संकटात कृषी व पणन विभागाने अडचणींवर मात करत शेतमाल निर्यातीची युरोप व आखाती देशांतील संधी साधली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी जागतिक दर्जाचे शेतमाल उत्पादन करण्याबरोबरच कोरोनाच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. पणन विभागामार्फत निर्यातदारांना सर्व सुविधा देण्यात येत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. - अनुप कुमार, प्रधान सचिव, पणन विभागकेळीची विक्रमी निर्यातगेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजार टन अधिक म्हणजे २२ हजार ५०० टन केळी निर्यात झाली. द्राक्षनिर्यातीनेही सात हजार टनाचा टप्पा गाठला. लिंबुची तर जवळपास चार पट म्हणजे ४४५ टन निर्यात झाली. नारळालाही चांगली मागणी आहे. भाजीपाल्याचीही एक हजार टन अधिक म्हणजे ८,२०१ टन निर्यात झाली.रमजानमुळे फळांना मागणीरमजान महिना सुरू झाल्याने मध्य-पूर्व देशांमधून फळे व भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे कोरोनाचा फळांच्या निर्यातीवर फारसा परिणाम झालेला नाही. द्राक्षे, टरबुज, खरबुज, डाळिंब, केळी आदी फळांची मे अखेरपर्यंत निर्यात सुरू राहील.मसाल्यांना पसंतीभारतातील मसाले युरोप व आखाती देशांमध्ये लोकप्रिय आहेत. एप्रिलमध्ये मिरचीची निर्यात ३०० टनाने वाढून एक हजार टन झाली. बटाटे, आले, लसूण, मसाल्याच्या पदार्थांनाही पसंती आहे.