मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच कोरोना टास्क फोर्ससोबत (Corona Task Force) कोरोना संकटावर बैठक पार पडली. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत (Secretary meeting) बैठक आयोजित केली आहे. रात्री 8.30 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. ( CM Uddhav Thackreay called immediate meeting with the Maharashtra Secretary on Lockdown in Maharashtra.)
या बैठकीत राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लावायचा की तीन आठवड्यांचा यावर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच कोणाला सूट द्यायची आणि कोणावर निर्बंध लादायचे आदी नियमावली देखील चर्चेत येणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्या सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये राज्यातील लॉकडाऊनचे होणारे परिणाम, कोणाला मदत करायची, किती करायची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊनला वेळ असला तरीदेखील उद्या याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊन कधी जाहीर करणार....मुख्यमंत्री दोन दिवस अर्थ विभाग आणि अन्य विभागांशी चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन लावताना गरीब वर्गाला कशा पद्धतीने मदत करता येईल यावर चर्चा होणार आहे. तसेच लगेचच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता नसून बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच १४ एप्रिल नंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
कालच्या बैठकीत काय झाले?काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेचच लॉकडाऊन करण्यात येणार नाही, काही दिवसांचा वेळ देऊन ल़ॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे थोड्याच वेळात 8 दिवस की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्याआधी तीन कामकाजी दिवसांचा वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.