मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोकले होते. यानंतर पोलिसांनी या आमदारांना व्हॅनमध्ये घालून नेले होते. आज पुन्हा हे आमदार मंत्रालयाबाहेर दाखल झाले आणि रास्तारोको करू लागले होते. आज पुन्हा पोलिसांनी येत या आमदारांना नेले आहे.
आज वानखेडे स्टेडिअमवर भारत वि. श्रीलंका मॅच आहे. यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असणार आहे. प्रेक्षकांसह नेहमी कामानिमित्त ये-जा करणारे लोक या भागातून जाणार आहेत. असे असताना आमदारांनी मंत्रालयाबाहेरच रास्ता रोको केल्याने कोंडी निर्माण झाली होती.
या आमदारांना पोलिसांनी पुन्हा व्हॅनमधून नेले आहे. यावेळी आमदारांनी आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, मराठा आंदोलन मिळेपर्यंत आम्ही एकाच पक्षाचे असल्याच्या घोषणा दिल्या.
राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. मराठा आंदोलनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.