ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 16 - शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मोघा खुर्द. (ता़. लोहारा जि़. उस्मानाबाद) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी सोमवारी कुलूप ठोकले.मोघा खुर्द येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे़ या शाळेची विद्यार्थी संख्या ४३ इतकी आहे. या विद्यार्थी संख्येनुसार या शाळेला दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, एक महिन्यापासून ही शाळा एका शिक्षकावर चालत आहे.
कार्यालयीन कामकाजामुळे या शिक्षकांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी वेळोवेळी जावे लागते़ एकाच शिक्षकाला ४३ विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे लागत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थत्तंनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी केली होती़.
मात्र, या मागणीकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने मोघा येथील बालाजी बाभळे, मारुती भोंडवे, संभाजी तडवळे,विक्रम गोरे, बाळासाहेब दळवे, लक्ष्मण भोंडवे, बबन भोंडवे, शरद भोंडवे, विनायक गरगडे, नागनाथ मत्ते, प्रशांत गोरे आदी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शाळेला कुलूप ठोकले. शाळेला कुलूप ठोकल्याचे समजताच शिक्षण विस्तार अधिकारी आदटराव यांनी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली़. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.