Lok Sabha 2019 : औरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव ठोकणार शड्डू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:22 PM2019-03-18T19:22:05+5:302019-03-18T19:26:24+5:30
मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते.
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला आहे. औरंगाबादमधून काँग्रेसकडून आता कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव चंद्रकांत खैरे याच्याविरुद्ध शड्डू ठोकण्याची शक्यता आहे. याआधी सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत होते. परंतु आता हर्षवर्धन जाधव यांचे नाव पुढे आल्याचे समजते.
मराठा आरक्षणावरून शिवसेनेला धारेवर धरणारे हर्षवर्धन यांनी आधीच औरंगाबादेतून लोकसभा लढविण्यासाठी दंड थोटपटले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन करून लोकसभा लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेसकडून त्यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते.
हर्षवर्धन यांच्यासह सुभाष झांबड आणि सतीष चव्हाण यांचे देखील नाव केंद्रीय समितीकडे पाठवले होते, असं काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी आधीच सांगितले आहे. परंतु आता हर्षवर्धन यांचे नाव आघाडीवर आहे.
२००९ मध्ये हर्षवर्धन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय मिळवला होता. मात्र आरक्षणाच्या मुद्दानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता.
दरम्यान औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन यांचे मतभेद सर्वश्रूत आहेत. त्यात खैरे यांच्याविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन यांचे नाव निश्चित झाल्यास औरंगाबादमधील लढत आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दानवे यांच्या भूमिकडे लक्ष
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई आहे. परंतु हर्षवर्धन यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे दानवे यांची अडचण होणार आहे. त्यामुळे दानवे यांची यावर काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागले आहे.