लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : लोकसभेच्या वेळी वेगळी गणिते होती. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते ठरवितात. भविष्याबाबत जो आदेश पक्षनेतृत्व देईल, तो पाळण्याचे काम आम्ही करू, काही दिवसांमध्ये काय होतेय, याची वाट पाहावी लागेल, असे विधान शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी केले.
डॉ. शिंदे फाउंडेशनच्या वतीने डीएनसी ग्राउंडमध्ये आयोजित रासरंग गरब्यानिमित्त खा. शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. खा. शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मनसेमहायुतीत होती. कल्याण लोकसभेत कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. ग्रामीणमध्ये खासदार शिंदे यांना मते मिळाली होती. त्यामुळे शिंदेसेना आपला उमेदवार याठिकाणी न देता मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.