मुंबई : खांद्याला खांदा लावून ज्यांनी एकसंध शिवसेनेत अनेक वर्षे सोबत काम केले, असे शिवसैनिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे चित्र किमान १२ लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसत आहे. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. याचा अर्थ, २५ टक्के मतदारसंघांमध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावले. यवतमाळ-वाशिममधील संजय देशमुख हे काँग्रेस, अपक्ष, भाजप आणि आता उद्धवसेना असा प्रवास केलेले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदेसेनेच्या राजश्री पाटील एकत्रित शिवसेनेकडून नांदेडमध्ये विधानसभा निवडणूक लढल्या होत्या. बुलढाणा मतदारसंघातील प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर हे जुने शिवसैनिक दोन वेगवेगळ्या गटांकडून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हातकणंगलेत शिंदेसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजीत पाटील असा मुकाबला आहे. सत्यजीत हे एकदा शिवसेनेचे तर एकदा काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.
लढत राष्ट्रवादीच्या दोन गटांत, पण... शिरुर हा एकमेव असा मतदारसंघ आहे, जिथे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होत असली, तरी तेथील दोन्ही प्रतिस्पर्धी हे शिवसेनेत राहिलेले आहेत. डॉ.अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट) हे दोघेही जुने शिवसैनिक आहेत.
कुठे कशा आहेत लढती?‘मातोश्री’चे निकटवर्ती अनिल देसाई हे मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात उद्धवसेनेकडून लढत आहेत. त्यांचा सामना ‘मातोश्री’शी अनेक वर्षे घनिष्ठ संबंध असलेले शिंदेसेनेचे खा.राहुल शेवाळे यांच्याशी होत आहे. नाशिकमध्ये उद्धवसेनेने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा महायुतीत शिंदेसेनेला मिळाली, तर तेथेही दोन शिवसैनिकांमध्येच लढाई होईल.
ठाणे मतदारसंघातही हेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेने तेथे खा.राजन विचारेंना संधी दिली आहे. हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे गेल्यास तिथेही शिवसैनिकांमध्येच लढत होईल. मराठवाड्यातील शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये देखील दोन शिवसैनिकच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने उभे ठाकले आहेत.