मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शिवसेना-भाजप युतीवर कडाडून टीका केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्टमधून युतीवर निशाना साधला.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्या सभेत लोक कांदा-कांदा म्हणत कांद्याच्या दराबद्दल विचारत होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा रेटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. जनतेच्या समस्या समजून न घेता, युतीकडून एकपात्री प्रयोग सुरू आहे. या प्रयोगांमुळे युतीची सत्ता येणार नाहीच, पण खोटेपणाचे प्रयोग पाहुन एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार युतीला नक्की मिळेल, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.
यावेळी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील विकासाचे मुद्दे शोधा आणि बक्षीसे जिंका अशी स्पर्धा ठेवायला हवी असे रोहित यांनी सांगितले. युती म्हणजे, 'गोल माल है भाई सब गोलमान है' म्हणत, युतीचं विसर्जन करण्यास हरकरत नाही, असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहित पवार यांच्या टीकेवर शिवसेना-भाजप युतीकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.